Sunday, October 30, 2011

नाट्यरंग : ‘पाहिजे जातीचे’ गुंतवणारं कथानाटय़!

Lokasatta Marathi news paper- रवींद्र पाथरे, रविवार, ३० ऑक्टोबर २०११

Loksatta_LogoNew मनोरंजन पुरवणी (पान ९)

‘पाहिजे जातीचे’ गुंतवणारं कथानाटय़!

नाटककार विजय तेंडुलकरांची मिताक्षरी, परंतु संपृक्त लेखनशैली, त्यातून व्यक्त होणारा धारदार आशय, त्यांची विषयाला भिडण्याची थेट पद्धती आणि त्याकडे पाहण्याचा खास तेंडुलकरी दृष्टिकोन यामुळे त्यांची कुठलीही कलाकृती असो, मनुष्य त्यात कळत-नकळत गुंतत जातो. ‘पाहिजे जातीचे’ हे त्यांचं नाटककार म्हणून ऐन बहरात असतानाचं नाटक. नाटकापेक्षा कथानाटय़ाकडे अधिक झुकणारं. ‘कहानी का रंगमंच’ ही संकल्पना हिंदीभाषक नाटय़कर्मी देवेन्द्र राज अंकुर यांनी रुजविल्याचे डिंडिम ‘भारतीय रंगभूमी’वर वाजविले जात असले, तरी त्यांच्याही कितीतरी दशके आधीच ही संकल्पना मराठी रंगभूमीवर अस्तित्वात आलेली होती. मात्र, असल्या गोष्टींचं अनावश्यक भांडवल करण्याची मराठी रंगभूमीची पद्धत नसल्यानं त्याचं श्रेय असे कुणीही सोमेगोमे घेतात. आणि याला आपण आक्षेपही घेत नाही, हे आपलं दुर्दैव. असो. तेंडुलकरांनी कथानाटय़ाचा हा फॉर्म अत्यंत लीलया हाताळलेला दिसतो. ‘पाहिजे जातीचे!’ हे त्यापैकी एक नाटक. या नाटकाच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट नमुद करायला हवी. ती ही की, तेंडुलकर कुठल्याही घटना-प्रसंगांकडे बुद्धिवादी, वस्तुनिष्ठ चष्म्यातूनच नेहमी पाहत आलेले असल्यानं त्यांच्या नाटकांतून (नव्हे, सर्वच कलाकृतींतून!) रोमॅंटिसिझम अभावानंच आढळतो. अपवाद फक्त : ‘अशी पाखरे येती’ आणि काही अंशी ‘पाहिजे जातीचे!’ त्यामुळे हे तेंडुलकरी नाटक असूनही हळुवारपणाचा एक नाजूक स्पर्श त्यात जाणवतो. नाटकाच्या नावावरून प्रथमदर्शनी त्यात जातिगंडाची समस्या मांडली असावी असा सकृतद्दर्शनी समज होत असला तरी जातिश्रेष्ठतेचा पुसटसा उल्लेख वगळता हे नाटक वेगळ्याच अंगानं एका तरुणाचं आयुष्य रेखाटतं. पालवी प्रॉडक्शननं ‘पाहिजे जातीचे!’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर सादर करून प्रेक्षकांना तेंडुलकरी नाटकाचा एक वेगळा वानवळा पेश केला आहे.
महिपती पोरपारणेकर या चिवित्र नावाचा तरुण घरच्या दैन्य-दारिद्रय़ाशी दोन हात करत महत्प्रयासानं तिसऱ्या वर्गात का होईना, एम. ए. व्हायचं आपलं स्वप्न अखेरीस पुरं करतो. त्यासाठी त्यानं भयंकर खस्ता खाल्लेल्या असतात. पदवी हाती पडताच आपलं आयुष्य बदलेल, अशी त्याची भाबडी समजूत असते. प्रत्यक्षात मात्र एम. ए.ची पदवी हातात पडताच त्याची प्रेसमधली तुटपुंज्या पगाराची नोकरीही जाते. पदवीधर महिपतीला कमी पगारात राबवून घेणं योग्य नसल्याचं कारण देऊन नोकरीतून कमी केलं जातं. त्यामुळे जिवाचा आटापिटा करून मिळविलेल्या पदवीबद्दल आनंद व्यक्त करायचा, की त्यापायी नोकरी गेली म्हणून शोक करायचा, हेच महिपतीला समजेनासं होतं. तो जिथं नोकरी करत असतो त्या नियतकालिकाचे ध्येयवादी संपादक ईश्वरभाई त्याची चक्क बोळवण करतात. हताश महिपती आता पुढं काय करायचं, या भुंग्यानं संत्रस्त होतो. तो मग महाराष्ट्रातील झाडून साऱ्या कॉलेजांतून प्राध्यापकपदासाठी अर्ज खरडण्याचा सिलसिला सुरू करतो. परंतु सगळ्यांकडून या ना त्या शब्दांत नकारच वाटय़ाला येतो. असंख्य नकारघंटांनंतर अखेरीस एका दूरच्या गावातल्या कॉलेजातून मुलाखतीसाठी त्याला पाचारण करण्यात येतं. पण तेवढय़ानंही महिपती प्रचंड खूश होतो. कमसे कम कॉल तरी आला! पण इंटरव्ह्यूला जायचं तर अंगावर बरे कपडे हवेत. त्यासाठी लॉण्ड्रीवाल्याला मस्का लावणं आलं! लॉण्ड्रीवाला महिपतीच्या आधीच्याच थकलेल्या बिलांबद्दल त्रागा करत शेवटी त्याला मुलाखतीला जाण्यासाठी भाडय़ानं कपडे देतो.

DSCN2452
महिपती एसटीनं त्या गावात उतरतो खरा; पण तिथली सगळी माणसं त्याच्याकडे चमत्कारिक नजरेनं बघत राहतात. कुणीही त्याला कॉलेजचा पत्ता धडपणे सांगत नाही. शेवटी आपल्या आपणच कसंबसं शोधत तो कॉलेजात पोहचतो. पाहतो तर तो चक्क गुरांचा गोठा असतो. बाहेर कॉलेजची पाटी लावलेली असते. त्यावरून इथं आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय, याची महिपतीला कल्पना येते. परंतु चालून आलेल्या एकमेव नोकरीला भिडण्याशिवाय आता त्याला गत्यंतरही नसतं.
गावातले पुढारी कम् शिक्षणसंस्थेचे गावठी चेअरमन त्याची खिल्ली उडवत त्याचा ‘इंटरवू’ घेतात आणि त्याला आपल्या कालिजात चिकटवून टाकतात. कॉलेजच्या प्राचार्याना तर ते घरगडय़ाप्रमाणेच वागवतात. इंटरव्ह्य़ूच्या या फार्सवरून इथं आपल्याला कशाकशाला तोंड द्यावं लागणार आहे, याचा अंदाज महिपतीला येतो. आणि पहिल्याच दिवशी वर्गावर गेल्यावर त्याचा झणझणीत अनुभवही येतो. गावातली इरसाल पोरं त्याची वर्गात शिरल्या शिरल्या जी फे-फे उडवतात, त्यानं तो पारच गळाठतो. परंतु आता अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याशिवाय तरणोपाय नाही, हेही त्याला कळून चुकतं. तेव्हा मग बाह्य सरसावून पोरांचा नेता असलेला सरपंचाचा गावगुंड पोरगा बबन्या याला महिपती भर वर्गात अस्खलित गावरान शिवीगाळ करत चक्क कानफटवतो. घडल्या प्रकारानं सगळी पोरं बिथरतात. बबन्या तर सुडानं फणफणतो. मात्र महिपती ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी’ ही उक्ती अंगीकारत पोरांना त्यांच्यासारखंच वागून आपल्या बाजूनं वळवतो आणि त्यांचा विश्वास पैदा करतो. महिपतीच्या या वागण्यानं सूड घेण्यासाठी आसुसलेला बबन्याही शेवटी नांगी टाकत महिपतीच्या कळपात शिरतो.
कॉलेजातील महिपतीच्या सहकारी प्राध्यापकांना त्यानं गावातल्या वांड मुलांवर नेमकी काय जादू केली, हेच कळत नाही. महिपतीचं मुलांमधलं हे वाढतं वर्चस्व प्राचार्याना खुपू लागतं. ते चेअरमनच्या गावंढळ तरुण पुतणीला कॉलेजात लेक्चरर म्हणून चिकटवून घेतात. तेही महिपतीच्या हाताखाली! जेणेकरून यथावकाश त्याला नारळ देता यावा! महिपती त्यांची ही चाल ओळखतो आणि नलिनीलाच फितवायचं ठरवतो. बबन्याच्या ‘कर्तृत्वा’नं त्याला ही संधी आयतीच चालून येते आणि महिपतीचं नलिनीशी गुटर्गु सुरू होतं.
यथाकाल अशा गोष्टींचा बोभाटा व्हायचा तो होतोच. चेअरमनच्या कानावर या गोष्टी जातात. ते महिपतीच्या मागे असा काही झक्कू लावून देतात, की त्याला नलिनीशी साधं बोलणंही मुश्कील होतं.
..महिपती या त्रांगडय़ातून कसा काय मार्ग काढतो, त्यात तो यशस्वी होतो का, वगैरे गोष्टी प्रत्यक्ष नाटकात पाहणंच योग्य!
म्हटली तर ही कथा आहे- एका लहानग्या गावातून मोठं स्वप्न उराशी बाळगून प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या एका तरुणाची! म्हटलं तर माणसाच्या उपजत शहाणपणानं प्राप्त परिस्थितीवर कशी मात करता येते, याचं दर्शन घडवणारं हे नाटक आहे. या नाटकात तेंडुलकरांच्या सूक्ष्म नर्मविनोदाचा, तसंच माणसांच्या चित्रविचित्र नमुन्यांच्या सखोल निरीक्षणाचा जागोजागी प्रत्यय येतो. घटिताला नाटय़पूर्ण कलाटणी देण्याचा त्यांचा गुणही यात जाणवतो. अनेक नाटय़स्थळं, असंख्य पात्रं, काळाचा मोठा पट, नाटय़मय घटना-घडामोडी असं सगळं भलंथोरलं प्रकरण या नाटकात अभिप्रेत असल्यानं ते सादर करताना प्रायोगिकतेचा आधार घेण्याशिवाय पर्यायच नाही. दिग्दर्शक अनिल गवस यांनी तो कौशल्यानं घेतलेला आहे. एकातून एक प्रसंग उलगडण्यासाठी त्यांनी सूचक नेपथ्याचा केलेला वापर याचंच द्योतक आहे. यातले प्रसंगबदल प्रेक्षकांच्या साक्षीनंच होतात. प्रदीप पाटील यांच्या स्थळसूचक फ्लॅट्सनी व मोजक्या प्रॉपर्टीनं हा पट उलगडण्यास मोलाचं साहाय्य केलं आहे. अनिल गवस यांनी हा स्पॅन प्रकाशयोजनेद्वारे ठळक केला आहे. दिग्दर्शक म्हणून ठसठशीत आणि सुस्पष्ट पात्ररेखाटनावर गवस यांनी जोर दिलेला आहे. त्याचवेळी नाटय़ांतर्गत गती कायम ठेवण्यावर त्यांचा भर जाणवतो. यातली दोन गाणी मात्र नाटकाच्या ओघवत्या प्रवाहात अवरोध बनून येतात. ती टाळता आली असती तर बरं झालं असतं. गवस यांनी नाटकाची जातकुळी ओळखून त्यानुरूप त्याची हाताळणी केली आहे. मात्र, दुसऱ्या अंकात आत्याबाईर्ंच्या अपहरणाचा प्रसंग थोडा अनावश्यकरीत्या ताणला गेला आहे. त्यात कलाकार प्रेक्षक-प्रतिसादात वाहवत गेल्यासारखे वाटतात. या प्रसंगातला आरडाओरडाही संयत केला असता तर बरं झालं असतं. आमिष कोन्द्रा यांचं संगीत सुश्राव्य आहे. नंदलाल रेळे यांनी पाश्र्वसंगीतातून घटना-प्रसंग उठावदार केले आहेत.

DSCN2462
सर्वच कलाकारांची मन:पूर्वक कामं हे ‘पाहिजे जातीचे!’च्या दृक्-परिणामाचं यश आहे. भूमिका छोटी असो वा मोठी, ती किती संवेदनशीलतेनं केली जाते, याला अधिक महत्त्व असतं. ‘पाहिजे जातीचे!’मधल्या सगळ्या कलावंतांचं यासाठी मनापासून कौतुक करायला हवं. यातली महिपती पोरपारणेकरची प्रमुख भूमिका मंगेश साळवी यांनी ज्या नजाकतीनं केलेय, त्याला तोड नाही. महिपतीची असहायता, हतबलता, त्याची व्यथा-वेदना, त्यातून ‘बचेंगे तो और भी लढेंगे’च्या जोशात त्यानं आल्या प्रसंगाला अंतरात्म्याच्या सादेनुसार सामोरं जाणं, या यशानं हुरळून न जाता पुढच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज होणं, नलिनीवरच्या प्रेमातलं व्यवहारीपण आणि नंतर खरोखरच तिच्या प्रेमात पडणं, ती मिळावी म्हणून अटीतटीला येऊन धाडसी मार्ग पत्करणं, चेअरमन किंवा बबन्या यांच्यासारख्या तिरक्या चालीच्या माणसांशी वागता-बोलतानाचा त्याचा गनिमी कावा, आणीबाणीच्या प्रसंगात आतून तंतरलेली असताना वरकरणी त्यानं आणलेला उसना आव आणि त्या प्रसंगांतून निभावून जाणं.. हे सारं मंगेश साळवी यांनी उत्कटतेनं दाखवलंय. त्यांना रांगडय़ा बबन्याच्या रूपात साथ केलीय शोण भोसले यांनी! त्यांच्यावर किंचित संजय नार्वेकरांचा प्रभाव जाणवतो. मानसी भागवत यांनी पारंपरिक, कर्मठ घरात वाढलेल्या अल्पशिक्षित तरुणीची- नलिनीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. तारुण्यातील कोवळीकता, नवथर प्रेमातला अल्लडपणा आणि कर्मठ संस्कारांत वाढल्यानं झालेली झापडबंद मानसिकता; मात्र प्रेमानुभवाचं हवंहवंसंपण अनुभवल्यावर तिच्या मनात बंडाची पडलेली ठिणगी.. आणि शेवटी परिस्थितीशरण होऊन मुकाटय़ानं घरच्यांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करून महिपतीच्या आयुष्यातून निघून जाणं- हा सारा आलेख त्यांनी व्यवस्थित रेखाटलेला आहे. सुनील पेंडुरकरांनी गावरान धटिंगण चेअरमनचा बेरकीपणा छान दाखवलाय. प्रभाकर कर्ले यांनीही सत्तेपुढे गलितगात्र झालेल्या प्राचार्याची लाचारी सर्वागातून व्यक्त केली आहे. मनीष शिंदे, गणेश घाडी, ज्योती बामणे, रश्मी शिंदे, राकेश पाटील, राहुल कुलकर्णी, उदय दरेकर, सुशांत काकडे, महेश निकम, क्षितीज पन्हाळे, विश्वंभर जाधव, मदन देशमुख, प्रसाद शेटय़े, तेजस भोर, प्रशांत मोहिते, कुणाल मेश्राम, मृणाल झेंडे, सुजाता पंड, प्रतीक्षा चव्हाण, धनश्री जैन, विशाल कुलथे, निलेश शेवडे या सगळ्याच कलाकारांनी आपापली कामं चोख केली आहेत. तेंडुलकरांचं हे वेगळ्या धर्तीचं नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस यायला हरकत नाही.

                                                                                              रवींद्र पाथरे

                                                               ( प्रसिद्ध नाट्य समीक्षक, पत्रकार )

                                              

No comments: