Saturday, September 24, 2011

खळाळता आनंददायी अनुभव - म.टा. नाट्य-परीक्षण

Maharashtra Times article 24 Sep 2011, 0549 hrs IST - जयंत पवार

matalogo-photo

खळाळता आनंददायी अनुभव

हा फोटो मोठ्ठा करून पाहण्या साठी फोटोवरच क्लिक करा
चित्र मोठ्ठ करून पहा !
समांतर-प्रायोगिक रंगभूमीवर काल झालेली नाटकं आज मुख्य धारेतील रंगभूमीवर सादर होतात तेव्हा रंगभूमी पुढे गेल्याची खूण पटते. आशय-विषयात आणि सादरीकरणात काल जो 'प्रयोग' ठरत होता तो आज सर्वसामान्य नाट्यरसिक नीट स्वीकारताना दिसताहेत. विजय तेंडुलकरांची अशी प्रयोगशील नाटकं त्यांच्या वेगळेपणासकट व्यावसायिक रंगभूमीवर करताना आता तरी कुणाला प्रश्न पडू नयेत. याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे 'पाहिजे जातीचे' या नाटकाचे पालवी प्रॉडक्शन या संस्थेतर्फे होणारे प्रयोग. चौतीसेक वर्षांपूर्वी हे नाटक 'आविष्कार'ने सादर केलं. अरविंद देशपांडे दिग्दर्शक आणि विहंग नायक, नाना पाटेकर, सुषमा तेंडुलकर असे कलावंत प्रमुख भूमिकेत होते. नाटकाचे शंभराहून अधिक प्रयोग झाले तरी तेव्हा आणि त्यानंतर ते मुख्य धारेत कोणी सादर केलं नव्हतं. एकतर यातली पात्रसंख्या आणि नायकाच्या अखंड निवेदनातून सरकणारी कथा हे त्यावेळच्या व्यावसायिक गणितात बसले नसावेत. आज मात्र ते दिग्दर्शक अनिल गवस आणि त्यांच्या कलावंत टीमने ते आत्मविश्वासपूर्वक आणि आकर्षकपणे पेश करत एक खळाळता नाट्यानुभव आपल्यासमोर ठेवला आहे. तसं पाहिलं तर, हे काही तेंडुलकरांच्या अव्वल नाटकांपैकी नव्हे. तरी तेंडुलकरी लेखनाची वैशिष्ट्यं त्यात पुरेपूर आहेत. विशेष म्हणजे, तेंडुलकरांच्या 'सेक्स आणि व्हायलन्स' थिअरीत खूपसा दुर्लक्षित राहिलेला तेंडुलकरी विनोद यात सापडतो, जो त्यांच्या सुरुवातीच्या नाटकांमध्ये हमखास झिरपलेला असायचा. 'पाहिजे जातीचे'चा नायक महिपती बभ्रुवाहन पोरपारणेकर याच्या निवेदनातून उलगडणाऱ्या कथानकात हा विनोद अस्तरासारखा आला आहे. किंबहुना अनेक ठिकाणी मार खाल्लेल्या, संघर्ष हेच जीवनतत्त्व बनून गेलेल्या आणि नाटकातील गोष्टीतही अंतिमत: पराभूत होणाऱ्या महिपतीच्या जीवनदृष्टीचाच हा विनोद एक भाग आहे. तो साऱ्या निराशाजनक परिस्थितीकडे खट्याळपणे, मिष्किलपणे बघतो म्हणूनच तगून राहू शकतो. या वैशिष्ट्यपूर्ण विनोदाचं आव्हान नव्या प्रयोगाने फार उत्तम पेललं आहे. स्वत:ला हसत हसत व्यवस्थेने करून ठेवलेली मधल्या जातीत जन्मण्याची गोची महिपती फार नेमकेपणाने सांगून जातो. 

शिक्षणाच्या नावाखाली बोगस विद्यार्थ्यांची नोंद, शिक्षकांची मागणी आणि त्यासाठी मिळणारं सरकारी अनुदान लाटणं हे प्रकार आत्ताआत्ताच वर्तमानपत्रात येऊन गेले. महिपती खेड्यात जन्मलेला, गरीब घरातला पण कष्टाने थर्ड क्लास एम. ए. झालेला तरुण काहीही करून गाव सोडायचं आणि शहरात जाऊन नोकरी करायची या वीतभर ध्येयाने पछाडलेला पण तेही साधता साधता दमछाक झालेला. तरीही चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवून असलेला. प्राध्यापकाची नोकरी मिळावी म्हणून सगळीकडे अर्ज टाकून नकार घेत बसणं त्याच्या नशिबी आलंय. योगायोगाने त्याला एका खेड्यातल्या कॉलेजातून कॉल येतो, जे गुरांच्या गोठ्यातच भरतं. तिथे नोकरी लागल्यावर ती टिकवून ठेवणं हेच कसं दिव्य बनतं आणि अंतिमत: त्याची जातच त्याच्या मुळावर कशी येते, याची धमाल गोष्ट तो स्वत:च्याच तोंडाने सांगतो.

अनिल गवस यांनी वरकरणी सोपं वाटणारं पण पेलायला कठीण असलेलं हे नाटक अत्यंत नेटकेपणे आणि परिणामकारक हाताळलंय. एकीकडे महिपतीचं अखंड निवेदन आणि दुसरीकडे त्याला पूरक नाट्यप्रसंग घडवण्यासाठी केलेला समूहाचा वापर या दोन्हींचा समतोल गवस यांनी चांगला सांभाळला आहे. एखादी कॉमिक स्ट्रीप बघावी तशी काही समूह आकृतीबंधांची मालिका डोळ्यापुढून सरकते. समूहाचा गोंधळही सुनियंत्रित आहे. खूप मोठ्या लांबीचं निवेदन हे सादर करताना फसलं तर कंटाळवाणं होतं, पण गवस यांनी त्यातलं कथन रंजक कसं राहील हे पाहिलंय. प्रदीप पाटील यांच्या रंगवलेल्या फ्लॅटस्नी विविध प्रसंगांतली नेपथ्याची गरज उत्तमपणे भागवत त्यातली गतिमानता राखायलाही मदत केली आहे. नाटकातला खटकणारा भाग एकच आहे तो म्हणजे त्यातल्या नृत्यप्रधान गाण्यांचा. ही गाणी आणि नृत्यं स्वतंत्रपणे चांगली असली तरी नाटकाच्या जातकुळीशी त्यांचा मेळ जुळत नाही. पार्श्वसंगीत मात्र उत्तम आहे.

मंगेश साळवी (महिपती), शोण भोसले (बबन्या पवार) आणि मानसी भागवत (नलिनी) या तीन पात्रांना संपूर्ण नाटकात महत्त्व असलं तरी पंचवीसेक कलावंतांनी समूहातल्या छोट्या-मोठ्या भूमिका बहारदार केल्या आहेत. यातल्या काहींच्या वाट्याला छोट्या व्यक्तिरेखाही आल्या आहेत. त्या त्यांनी उत्कटपणे साकारल्या आहेत. सुनील पेंडुरकर हा दोन-तीन छोट्या भूमिका करणारा कलावंत त्याचं व्यक्तिमत्व आणि शैली यामुळे लक्षात राहतो. सर्व कलावंत नवे असले तरी समूह म्हणून ते आत्मविश्वासाने पेश होतात.

मंगेश साळवी या कलावंताचा महिपती संस्मरणीय आहे. नाटकाचा तो नायक आहे, कथानकाचा सूत्रधार आहे आणि अदृश्य नियतीच्या हातातलं कळसूत्री बाहुलंही आहे. या तीनही पातळ्यांचं भान मंगेशच्या निवेदनातील बदलत जाणाऱ्या पोतांमधून व्यक्त होतं. विनोदाची त्याला उत्तम समज आहेच पण व्यक्तिरेखेचा ठावही त्याने जाणकारीने घेतला आहे. शोणचा रांगडा बबन्या पवार हा त्याच्या सहज शैलीतल्या अदाकारीने लक्षात राहतो. त्याचा बबन्या अकृत्रिम आहे. त्याचं गडबडणं, नर्व्हस होणं, आक्रमक होणं ह्या सगळयातला गावठी मॅडनेस हा कलावंत दाखवतो. मानसी भागवतने नलिनी ठसक्यात आणि लोभस उभी केली आहे. यांच्या जोडीला आक्का, ईश्वरभाई, प्राचार्य या लहान व्यक्तिरेखाही लक्षात राहतात.

निर्मिती : पालवी प्रॉडक्शन
लेखक : विजय तेंडुलकर
दिग्दर्शक आणि प्रकाशयोजना : अनिल गवस

संगीत : आतिष कोंड्री
पार्श्वसंगीत : नंदलाल रेळे
नेपथ्य : प्रदीप पाटील
कलावंत : मंगेश साळवी, शोण भोसले, मानसी भागवत, सुनील पेंडुरकर, प्रभाकर कर्ले, गणेश घाडी, मनीष शिंदे, ज्योती बामणे, रश्मी शिंदे, राकेश पाटील, राहुल कुलकर्णी, उदय दरेकर, सुशांत काकडे, महेश निकम, क्षितीज पन्हाळे, विश्वंभर जाधव, मदन देशमुख, प्रसाद शेट्ये, तेजस भोर, प्रशांत मोहिते, कुणाल मेश्राम, मृणाल झेंडे, सुजाता पंड, प्रतीक्षा चव्हाण, धनश्री जैन, विशाल कुलथे, नीलेश शेवडे.

Jayant-Pawaredited1
- जयंत पवार (सुप्रसिद्ध नाट्य समीक्षक, लेखक, पत्रकार )

No comments: